रोजच्या आहारात कोणत्या चवीचे पदार्थ किती घ्याल?


आहार सहा रसयुक्त हवा हे तर खरेच पण त्यांचेही काही प्रमाण हवे कारण त्यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा आहे .जर हे रस योग्य प्रमाणात खाल्ले गेले तर ते उत्तम परिणाम देतात पण प्रमाण बिघडले तर काही दुष्परिणामही करतात .
जन्माला आल्यानंतर पहिला पदार्थ जर आपण कोणता खात असू तर एक तर मध किंवा दूध .हे दोन्ही रस चवीला गोड असतात आणि बाळ थोडे मोठे होईपर्यंत त्याला बहुतेकवेळा गोड रसाचेच पदार्थ खाऊ घातले जातात त्यामुळे गोड रस प्रत्येक व्यक्तीचा जन्मापासून परिचित असणारा रस आहे.ह्या रसामुळेच आपल्या शरीराची ,वेगवेगळ्या शरीर घटकांची वाढ होते .शक्ति येते .सगळी इंद्रिये चांगल्या पद्धतीने काम करतात .नंतर थोडे वय वाढल्यानंतर जो आहार आपण घेतो त्यातही गहू, तांदूळ ,दूध किंवा इतरही पिष्टमय पदार्थ जेजे खातो ते प्रामुख्याने मधुर रसयुक्त असतात ,त्यामुळे आपली रोजची होणारी झीज भरून निघते आणि काम करायला उर्जा मिळत राहते.म्हणून आपल्या जेवणात भात आणि पोळी यांचे प्रमाण सर्वात जास्त असते.
आंबट रस मात्र अगदी थोडा घ्यावा त्यामुळे आपण ताटात लिंबाची किंवा लोणच्याची एखादीच फोड घेतो तेवढीच घ्यावी .भाजीसारख्या प्रमाणत लोणचे खाणारे रुग्ण आम्ही जेव्हा बघतो तेव्हा थक्क होतो.अतिरेकी प्रमाणात आंबट रस खाल्यामुळे त्वचा सैल होते ,तिचा tone कमी होतो,वार्धक्य लवकर येते ,अंगावर सूज येते ,पित्त दोष वाढून अंगाला खाज येणे,पुरळ येणे ,जास्त तहान लागणे अश्या तक्रारीही जाणवू शकतात.
मिठाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो .खरे तर कोणत्याच पदार्थात वरून मीठ लावून खाऊच नये .काही जण जेवणाची सुरुवातच मिठात बोट लावून करतात ,मीठ बरोबर आहे की नाही याची शहानिशा करताच मीठ लावायची सवयच असते यांना आणि मग दिवसेंदिवस जास्त मीठ खाण्याची गरज भासू लागते.ताटात अन्न वाढायला सुरुवात करण्यापूर्वी चिमुटभर मीठ वाढायची पद्धत आहे.गरज वाटल्यास तेव्हढेच मीठ लावून घ्यावे असा थोडक्यात संकेत असतो.पापडातही मीठ आणि पापडखार असतो ,त्यामुळे पापड खाल्ल्यास एका वेळी एखादाच खावा.खूप मीठ खाणाऱ्या व्यक्तींना लवकर टक्कल पडते ,केस गळतात ,केस लवकर पांढरे होतात,त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात,वार्धक्य अकाली येते .निदान आपल्या वयाची आणि सौंदर्याची काळजी म्हणून तरी मिठावर नियंत्रण ठेवावे .प्रौढ वयात जर मग blood pressure चा त्रास सुरु झाला तर अजिबातच मीठ खाण्याची परवानगी मिळत नाही .
मेथी ,कारलं किंवा कडवे वाल यासारखे कडू रसाचे पदार्थ अथवा भाज्या एकूणच कमी खाल्ल्या जातात पण त्या थोड्या प्रमाणात का होईना अधूनमधून आहारात हव्याच ,मुलांनाही निदान ताटात वाढलेली पहिली वाढ खायची सवय लावली पाहिजे .पित्तप्रधान व्यक्तींना मात्र या कडू भाज्या खाल्ल्या की लगेच डोकेदुखी ,उलट्या ,मळमळ असा त्रास होतो आणि नेमक्या याच व्यक्तींना ह्या कडवट भाज्या फार आवडतात आणि त्रास झाला तरी खाण्याचा मोह टाळू शकत नाहीत .
तिखट खाण्याच्या बाबतीत मात्र महाराष्ट्रीयन माणसाचा हात कोणीच धरणार नाही.नाकातोंडातून पाणी आले पाहिजे,घशात जळजळ झाली तरी चालेल पण लालभडक तरी /रस्सा असलेली भाजी ,आमटी ,nonvej पदार्थ ,मिसळ असं झणझणीत खायला पाहिजे .मिरचीचा ठेचा हवा ,लालेलाल चटणी हवी ,लोणचं हवं !! अतिप्रमाणात खाल्लेला हा तिखट रस मात्र त्रासदायकच असतो .यामुळे घशाची ,पोटाची आग होते ,तोंडाला छाले पडतात ,अति तहान लागते ,अशक्तपणा येतो .पुढे पुढे ulcer सारखे आजारही निर्माण होतात ,त्यामुळे हा प्रमाणातच खाल्लेला बरा !!
तुरट रस कमी प्रमाणातच खाल्ला जातो त्यामुळे त्याचे फार दुष्परिणाम दिसत नाहीत पण थोड्या प्रमाणात काहोईना तो खावा,रायआवळे ,कवठ कधीतरी खावे ,भाज्या आणि सर्व प्रकारच्या डाळी यात मुख्य चवीबरोबरच तुरट चव थोडी असतेच म्हणून तो आपोआप शरीराला मिळतो .
एकूण काय जास्त प्रमाणात खायच्या गोष्टी म्हणजे भात,पोळी हे ताटात आपल्या बरोबर समोर असावेत ,त्याखालोखाल भाजी आणि आमटी असावी,तोंडी लावण्यापुरते चटणी ,लोणचे ,लिंबू यांचे प्रमाण हवे,थोड्या प्रमाणत कोशिंबीर हवी ,थोडा पापड ,कुरडई हेही चाखावेत ,तळलेली भजी वगैरे क्वचितच खावे म्हणजे आपले स्वास्थ्य टिकून राहील.जेवताना अन्न चांगले मिसळावे म्हणून थोडे थोडे पाणी पीत राहावे .

Comments

Popular posts from this blog

Curd

Garlic in Ayurveda

पावसाळ्यात काय काळजी घ्यावी