पावसाळ्यात काय काळजी घ्यावी
पावसाळा सुरू झाला की तब्येतीच्या काही न काही तक्रारी डोकं वर काढतात .पहिले दोन तीन पाऊस पडेपर्यंत हवा आल्हाददायक असते कारण उन्हाळ्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेला आपण सगळेच कंटाळलेले असतो.थंड पावसाचे तुषार ,चिंब ओलावा ,गार वारा, हवा हे सगळं मनाला सुखावणारं असतं पण हेच चित्र पाऊस सुरु होऊन आठ पंधरा दिवस झाले की अगदी बदलून जातं. सतत रिपरिप पाऊस,चिखल, दमट,सर्द हवा,गारठा, सूर्य दर्शन नाही अशा स्थितीत एकदम वेगवेगळे आजार उफाळून येतात.
पहिला परिणाम पचनावर होऊन भूक अगदीच मंद होते. खावंसं वाटत नाही, बळजबरीने खाल्लं तर पोट डब्ब होतं, गच्च होतं, फुगते आणि कधी कधी दुखते पण ! कधी मळमळ होते.अशा वेळी दोन तीन साधे उपाय करावेत.
जेवणाच्या आधी दहा मिनिटे छोटा आल्याचा तुकडा साधं किंवा सैंधव मीठ लावून चावून खावा.
जेवणात आंबट चवीचा समावेश अवश्य करावा, यासाठी चिंच किंवा आमसुलाचं सार, टोमॅटो सूप ,कढी, फोडणी दिलेलं ताक किंवा आलं,मीठ घातलेला मठ्ठा यांचा वापर करावा.
पावसाळ्याच्या सुरुवातीला कैरीचं लोणचं खायची पद्धत अतिशय शास्त्रीय आहे. यातील आंबट,खारट चवीमुळे शरीरातील वात दोष कमी होऊन नियंत्रणात येण्यास मदत होते शिवाय यातील विविध प्रकारच्या मसाल्यांमुळे जिभेला नुसती चवच येत नाही तर अग्नी प्रदीप्त होऊन भूक आणि पचनशक्ती दोन्ही वाढते.
उसळी,हरबरा डाळीचे पदार्थ, कोरडे पदार्थ,भाकरी फार प्रमाणात खाऊ नये.
जेवताना गायीचे तूप सुरुवातीला बोटाने चाटावे ,यामुळे अग्नी वाढतो.
सर्दी,खोकला यांचा त्रास होऊ नये म्हणून आलं,लसूण यांचा स्वैपाकात वापर वाढवावा.आलं, गवती चहा टाकून चहा प्यावा. आहारात गुळाचा वापर केल्याने उष्णता वाढण्यास मदत होते. पाणी गार प्यावे. अंघोळ गरम पाण्यानेच करावी. रोज डोक्यावरून अंघोळ करु नये.
इतर व्हायरल फिवर वगैरे त्रास होऊ नयेत म्हणून पाणी निदान दहा मिनिटे खळखळ उकळून मग प्यावे. पाणी उकळताना त्यात चार सहा काळे मिरे, चमचाभर बडीशोप ,थोडी सुंठ पावडर टाकावी म्हणजे पाणी पचायला हलके होते शिवाय जंतुघ्न होते.सकाळी शिंका वगैरे येत असल्यास थोडा मध आल्याचा रस मिसळून खावा. घरात नियमित धूप घालावा किंवा ओव्याची धुरी फिरवावी.
सांधे दुखत असतील तर रोज तिळाचं तेल गरम करून चोळावे.पण जर सांधे जास्त दुखत असतील किंवा संधिवाताचा त्रास असेल तर मात्र त्याचे योग्य ते औषधोपचार व पंचकर्म करणं गरजेचं असतं.
पावसाळ्यात वात दोषाच्या नियंत्रणासाठी “ बस्ती”हे पंचकर्म अतिशय उपयुक्त व आवश्यक आहे.अंगाला औषधी तेलाने मसाज करुन ,औषधी काढ्याची वाफ दिल्यानंतर गुदद्वाराच्या वाटे एक दिवस तेलाचा आणि एक दिवस काढ्याचा एनिमा दिल्याने वेदना व सांध्यांची सूज पटपट कमी होते.हे कर्म सर्वांनी अवश्य करुन घ्यायला हवे.
इतर काळजीमध्ये पावसात भिजून तसंच ओल्या अंगानं, डोक्याने फिरणं खूप त्रासदायक आहे. छत्री,रेनकोट यांचा वापर करुन भिजणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. कपडे पूर्ण सुकलेलेच घालावेत . अर्धवट ओलसर किंवा दमट कपडे वापरल्यामुळे विविध प्रकारचे त्वचेचे इन्फेक्शन ,फंगल वगैरे होण्याची शक्यता असते.बाहेरून आल्यावर विशेषतः डोकं आणि पाय व्यवस्थित कोरडे करावेत. यामुळे ताप, सर्दी होण्याची शक्यता कमी होते तर पाय कोरडे केल्याने बोटांच्या मध्ये चिखल्या वगैरे होत नाहीत!
अंगावर डायरेक्ट थंड वारा किंवा पावसाचे तुषार उडणार नाहीत याची विशेषतः रात्री झोपताना काळजी घ्यावी. पुरेसे पांघरूण घेऊन झोपावे अन्यथा वात वाढून सांधे दुखणे,स्नायू दुखावणे, उसण भरणे यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात.
अशी सर्व प्रकारची काळजी घेतल्यास पावसाळा खरोखरच आल्हाददायक व आनंदी जाईल यात शंका नाही.
वैद्य राजश्री कुलकर्णी
Comments
Post a Comment