पावसाळ्यात काय काळजी घ्यावी
पावसाळा सुरू झाला की तब्येतीच्या काही न काही तक्रारी डोकं वर काढतात . पहिले दोन तीन पाऊस पडेपर्यंत हवा आल्हाददायक असते कारण उन्हाळ्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेला आपण सगळेच कंटाळलेले असतो . थंड पावसाचे तुषार , चिंब ओलावा , गार वारा , हवा हे सगळं मनाला सुखावणारं असतं पण हेच चित्र पाऊस सुरु होऊन आठ पंधरा दिवस झाले की अगदी बदलून जातं . सतत रिपरिप पाऊस , चिखल , दमट , सर्द हवा , गारठा , सूर्य दर्शन नाही अशा स्थितीत एकदम वेगवेगळे आजार उफाळून येतात . पहिला परिणाम पचनावर होऊन भूक अगदीच मंद होते . खावंसं वाटत नाही , बळजबरीने खाल्लं तर पोट डब्ब होतं , गच्च होतं , फुगते आणि कधी कधी दुखते पण ! कधी मळमळ होते . अशा वेळी दोन तीन साधे उपाय करावेत . जेवणाच्या आधी दहा मिनिटे छोटा आल्याचा तुकडा साधं किंवा सैंधव मीठ लावून चावून खावा . जेवणात आंबट चवीचा समावेश अवश्य करावा , यासाठी चिंच किंवा आमसुलाचं सार , टोमॅटो सूप , कढी , फोडणी दिलेलं ताक किंवा आलं , मीठ घातलेला मठ्ठा यांचा वापर...